पत्रकार निखील वागळे यांचे भाषण पुण्यात होऊ देणार नाही – धीरज घाटे

पुणे, ०७/०२/२०२४ – आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही. कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी पुणे शहर भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांना केली.

“मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत रत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते. केवळ प्रसिद्धी साठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेऊन पुण्याची शांतता बिघडवत असेल तर ते भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू”, असा कडक इशारा घाटे यांनी दिला.

पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घाटे यांच्यासह सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे, राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक महेश वाबळे, स्मिता वस्ते, प्रशांत हरसूले ,पुष्कर तुळजापूरकर हे उपस्थित होते.