“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है…”, हे गाणे म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना डिवचले

मुंबई, १४ मार्च २०२३ : महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डवचत तुफान टोले मारले
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो
आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो
असे गाणे म्हणत लक्ष वेधलेच पण अर्थसंकल्पात फसव्या घोषणा केल्या असून याची महाराष्ट्रातील सामान्य जनतेला भुरळ पडणार नाही, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

अर्थसंकल्पाला विरोध करताना जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून आपण त्यांचा चेहरा पाहत आहोत. तेव्हा माझ्या एक बाब लक्षात आली की, देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा सात-आठ महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांना चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचं तंत्र काही जमलं नव्हतं. आता त्यांना हे तंत्र जरा जमलं आहे. त्यांनी ते आत्मसात केलं आहे. आता ते छान आणि बऱ्यापैकी हसतात. त्यावर मला सहज काही ओळी आठवल्या. या ओळी दुसऱ्यांच्या आहेत मी फक्त वाचून दाखवतो….”

उपरोधिक टोलेबाजी करत जयंत पाटील पुढे म्हणाले, “जेव्हा सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं मला वाटलं होतं. पण अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती, किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊ… पण आता बघितलं तर किंगमेकर दिल्लीत बसले आहेत. इकडे आपल्या हातात फारसं राहिलं नाही. सगळं काही दोन नंबरच्या हातात आहे. त्यामुळे ‘क्या हाल है क्या दिखा रहे हो’ ही ओळ सगळ्यात महत्त्वाची आहे.”

“तुम्ही आता सगळ्यांनी दिल्लीला चकरा मारायला सुरुवात केली आहे. इकडे वशिला लावून काहीही उपयोग नाही. दिल्लीला गेल्याशिवाय आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी आज आपली मानसिक अवस्था झाली आहे. मी आज जास्त बोलणार नाही. तुम्ही जो अर्थसंकल्प मांडला आहे, तो शेवटचा अर्थसंकल्प याच भावनेनं मांडला आहे, याची महाराष्ट्राला जाणीव आहे. त्यामुळे घोषणा कितीही मोठ्या केल्या तरी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला याची भुरळ पडणार नाही. देवेंद्र फडणवीस हे वास्तवादी अर्थसंकल्प मांडतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तसा अर्थसंकल्प मांडला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाला माझा विरोध आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप