जयकुमार गोरे यांचा अपघात नव्हे तर घातपात ? वडिलांनी व्यक्त केली शंका

पुणे, २४ डिसेंबर २०२२ : माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाल्यनंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये गर्दीकेली आहे. त्यामुळे गोरे यांच्या पत्नीला कार्यकर्त्यांनी परत जात असे आवाहन करावे लागले. तर गोरे यांच्या वडिलांनी फलटणजवळ रस्त्यावर गर्दी नसते, तरीही हा अपघात झाला असे म्हणत घातपाताची शक्यता वर्तविल्याने यास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळली. अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोरे यांची भेट घेतल्यानंतर पत्नी
सोनिया जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘पुढील सात ते आठ दिवसांत जयकुमार गोरे मतदारसंघात परततील, कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, ते बरे आहेत, पाय आणि बरगडीला थोडंसं फ्रॅक्चर आहे, त्यामुळे दोन-तीन दिवस आपल्याला फक्त थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. अजून कुठे दुखापत आहे का वगैरे. आपण डॉक्टरांना सहकार्य करुयात, त्यांना त्यांचं काम करुद्यात, वरती आवरता आवरत नाहीत, माणसं खूप झालीत, माझं ऐकाल अशी विनंती करते, परमेश्वर चरणी प्रार्थना करा की लवकरात लवकर भाऊंची तब्येत बरी होऊ देत आणि तुमच्यात सामील होता येईल, अशी प्रार्थना करा.

तुम्ही अजिबात चिंता करु नका, तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही इथे थांबताय, एकदा नजर टाकावी, भेटावं, असं तुम्हाला वाटत असेल, पण तिथे फोटो काढायलाही परवानगी नाही, नाही तर मी तो काढून व्हायरल केला असता, इथली यंत्रणा काम करत आहे, त्यांनी विनंती केली की तुम्ही तुमच्या माणसांना विनंती करा, आयसीयूमध्ये कोणाला भेटता येत नाही, दादांनासुद्धा (वडील) मोठ्या मुश्किलीने एकदा दाखवून आणलं. तुम्हाला भाऊंची काळजी आहे, मला भरुन येतंय, पण मी सांगते, ते स्टेबल आहेत, आता चिंता करायची काहीच गरज नाही, मी रात्रीपासून अखंड त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवरही उपचार सुरु आहेत, ते सिरीअस आहेत, पण ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. फडणवीस, विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फोनवरुन चौकशी केली, चंद्रकांतदादा इथे येऊन गेले, अशी माहिती सोनिया गोरेंनी दिली.

दरम्यान, गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले, ‘‘मी जयकुमारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होतेय. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो असा प्रश्न पडलाय. ते देखील आमच्या गावात म्हणजे फलटण मध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही. मला शंका वाटतेय. मला वाटतं ते बोललो. हे फलटणमध्येच घडतंय गावात. म्हणून मला शंका वाटतेय मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असं जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले.