जरांगे पाटील यांचा धक्कादायक निर्णय महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांवर पाणी

आंतरवाली सराटी, ४ नोव्हेंबर २०२४ : मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असल्याचा रंग पाटील यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

गेल्या मगिन्याभरापासून जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत लढविण्यासंदर्भात अंतरवाली सराटी येथे बैठकांचा सपाटा सुरू केलेला होता. अनेक इच्छुक उमेदवारांनी देखील येऊन मुलाखती दिल्या मुस्लिम व दलित समाजाच्या प्रतिनिधींना बोलून आपण एकत्रितपणे निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांनी मांडली. मुस्लिम समाजाला जवळ केल्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. काल त्यांनी काही जागांवर उमेदवार निवडणूक लढवतील तर काही जागांवर पाठिंबा लवकर येऊ अशी जाहीर केले होते. मात्र, अचानकपणे जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केलेली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी जाहीर केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या” असंही आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.