मराठा आरक्षणासाठी मध्यरात्री खलबते, जरांगे पाटलांनी प्रस्ताव फेटाळला
पुणे, २४ जानेवारी २०२४ ः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मार्गक्रमण सुरू केले आहे. नगरमधील मुक्कामानंतर आता मनोज जरांगे पाटील लाखो समाजबांधवांसह लवकरच पुण्यात पोहोचणार आहेत. महायुती सरकारने मांडलेला तीन कलमी प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले होते. अडीच तासांनंतर त्यांना वेळ मिळाली. त्यानंतर पहाटे चार वाजता चर्चेला सुरुवात झाली. दीड तास चर्चा झाली. मुंबईचा दौरा टाळा असेही आवाहन त्यांना केले जात होते. परंतु, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकारी निघून गेले.
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज मध्यरात्रीच्या सुमारास रांजणगाव गणपती परिसरात आला. त्यानंतर जरांगे पाटलांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त आर्दडकर आणि जिल्हाधिकारी पांडेय त्यांची वाट पाहत होते. मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरही त्यांची चर्चा सुरू होती. जरांगे यांच्याबरोबर चर्चा करून काहीतरी तोडगा काढा, अशा सूचना त्यांना दिल्या जात होत्या. त्यानंतर पहाटे चार वाजता त्यांना जरांगे पाटील यांनी वेळ दिली. चर्चा सुरू झाली. दीड तास चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव अधिकारी जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला. तसेच मुंबईचा दौरा टाळा असेही आवाहन अधिकारी करत होते.
जरांगे पाटील मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सरकारचे प्रतिनिधी तेथून बाहेर पडले. या चर्चेत जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की कुणबी नोंदी सापडलेल्या 54 लाख लोकांना आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे. सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवा. क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणीने न्यायालयीन लढाई सुरुच राहिल. परंतु, त्याआधी सरकारने आम्हाला आरक्षण दिले पाहिजे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अधिकाऱ्यांकडून तीन कलमी प्रस्ताव मांडला जात होता. या प्रस्तावात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचे मान्य व्हावे. गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप