“माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार कोसळलं” – करुणा मुंडेंची टीका

मुंबई, 8 नोव्हेंबर 2022: माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार पडलं आहे”, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे तीन चाकी सरकार कधीही बनणार नाही”, अशी टीका धनंजय मुंडे यांंच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. “आपल्या किंवा मुलांच्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील”, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. “धनंजय मुंडे मला खूप त्रास देत आहेत. मुलांनाही घाणेरड्या धमक्या देत आहेत. त्यांनी बनावट खोटे व्हिडीओ माझ्या नावाने व्हायरल केले आहेत”, असा दावा मुंडे यांनी केला आहे.

२५ वर्षांच्या नात्यात झालेल्या त्रासाबाबत सांगताना करुणा मुंडे यांना रडू कोसळलं.

“घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्याचा दबाव टाकण्यासाठी धनंजय मुंडे माझ्या मुलांना उचलून घेऊन गेले होते. ‘लीव्ह इन’ मध्ये राहत होतो, असं खोटं सांगण्याचा तगादाही त्यांनी लावला होता. यासाठी ५० कोटींची ऑफर त्यांनी दिली होती” असा आरोप मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्य महिला आयोगानं वारंवार तक्रार करुनही दखल घेतली नाही, असे यावेळी मुंडे यांनी सांगितले आहे.

“माझ्याविरोधात षडयंत्र सुरू आहे. गाडीमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती. दोनदा तुरुंगात डांबण्यात आलं. सध्या माझ्या घरावर धनंजय मुंडेंचा डोळा आहे. मात्र मी घाबरणार नाही,” असे मुंडे म्हणाल्या आहेत. ताकद असेल तर माध्यमांसमोर घराचे कागद घेऊन या, त्यावर मी सही करेन, असं आव्हानही करुणा यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे. धनंजय मुंडेबाबत खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार यांना पत्र लिहूनदेखील काही झालं नाही, असे मुंडे यांनी यावेळी सांगितले. आत्तापर्यंत २५ तक्रारी केल्या आहेत, मात्र एकही एफआयआर दाखल झाली नसल्याची खंत मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली.