शिवाजी महाराजांची आणि मोदींची तुलना अशक्य – उद्धव ठाकरेंची टीका
नाशिक, २३ जानेवारी २०२४: महाराष्ट्रावर जो कुणी चालून आला त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मग आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल. नुसतं भाजपमुक्त नाही तर भाजपमुक्त “जय श्रीराम” अशी नवी घोषणा देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कुणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली. आजिबात नाही, त्रिवार नाही.. छत्रपती शिवरायांबरोबर तुलना कदापि शक्य नाही, असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले. नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, २०१८ मध्ये मी बोललो होतो त्यानुसार अयोध्येला गेलोही. परंतु मोदी अयोध्येला त्याआधी कधी गेले नव्हते. आधी गेले असतील जसे फडणवीस गेले होते. ते म्हणतात तसं. रामाचा एकतरी गुण तुमच्यात असेल तर आम्हाला कळू द्या. राम सत्यवचनी होते. पण तुम्ही शिवसेनेला डावलले असे सांगत ज्याने शिवसेना पळवली ते कुणीही वाली असतील त्यांचा वध आम्ही करणार, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला.
खरी घोटाळ्यांची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली आहे. त्याचा आधी हिशोब द्या, नंतर आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करा. एकट्या अमरावतीत 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज नोकऱ्या नाहीत. पण या बातम्या कुठेच दिसत नाहीत. मी चॅनल्सना दोष देणार नाही कारण त्यांच्यावर दबाव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
होय माझी घराणेशाहीच आहे. शिवसैनिक हीच माझी खरी संपत्ती आहे. हे शिवसैनिक वारसा हक्काने मिळाले, चोरून नाही. मोदी पंतप्रधान व्हावे यासाठीही मी ही प्रचार केला होता. शिवैसनिकांमुळेच मोदींना दिल्ली दिसली. पण आज मात्र आम्ही तुमच्यासाठी गुन्हेगार झालो. आमच्या चौकशा लावल्या जात आहेत. करा चौकशा पण आम्ही तर तुमची चौकशी करणार आणि तुम्हाला तुरुंगातही टाकणार आहोतच असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
आज ते घोटाळे बाहेर काढत आहेत. मग पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा ना. त्याचा हिशोब द्या मग आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करा. यांचेही अनेक घोटाळे आहेत. तुम्ही रुग्णवाहिकेत आठ हजारांचा घोटळा करता. कॅगचा अहवाल आहे माझ्याकडे. वेळ पडल्यास हा अहवाल सुद्धा मी बाहेर काढणारच आहे. कोरोना काळात तर भाजपशासित राज्यांत मृतदेहांवर उपचार करून पैसे खाल्ले. त्याबद्दल कुणीच बोलायचं नाही. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली. त्याचा हिशोब आधी द्या, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.