उदयनिधी स्टॅलीनचे मत उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा परखड सवाल

मुंबई, २४/०१/२०२४: सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे

मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बावनकुळे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, नव्याने पक्ष प्रवेश केलेले जळगावचे कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ . उल्हास पाटील उपस्थित होते.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत आहेत. या विचारावरच जी इंडी आघाडी तयार झाली त्या आघाडीत हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सामील आहेत.

• म्हणून नाशिकमध्ये गरळ ओकली
बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली , घराणेशाही नुसार मुख्यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले त्यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर , भाजपा वर टीका करण्याचा अधिकारच नाही. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता, पक्ष, कार्यकर्ते सगळेच निसटले. उद्धव यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. म्हणूनच अस्वस्थ, विचलित मानसिक अवस्थेत उद्धव यांनी नाशिक इथे मोदीजी आणि भाजपा विरोधात गरळ ओकली असे बावनकुळे म्हणाले.

• इंडी आघाडीची शकले होतील
इंडी आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पवित्र्यामुळे फूट पडल्याचे दिसून आले आहे . आगामी काळात एकीकडे इंडी आघाडीची शकले होताना दिसतील तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपा मध्ये पक्षप्रवेशाचा झंझावात दिसून येईल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

• उल्हास पाटील, भदाने यांचा भाजपा प्रवेश
जळगावचे माजी खासदार व काँग्रेस नेते उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी तसेच धुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील नेतृत्व बाळासाहेब भदाने यांनी धुळे तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचे सरपंच व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्षांनी स्वागत केले. डॉ. केतकी पाटील यांची भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले.