इंडिया अलायन्सचे नेतृत्व सामुहिक, १३ जणांच्या समितीची घोषणा
मंबई, १ सप्टेंबर २०२३: भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी स्थापन केली आहे, या आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार पडली. इंडिया आघाडीचे अध्यक्षपद किंवा समन्वयक पदी कोणत्या पक्षाकडे असणार यावरून गेले काही दिवस चर्चा सुरू होती. अखेर कोणत्याही एका पक्षाला प्रमुख न करता सामुहीक नेतृत्वातून आघाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस ‘इंडिया’ आघाडीची बैठक आयोजित केली होती. यामध्ये देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हसभागी झाले. या बैठकीत सहभागी होताना काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आदाणी घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याने एकच खळबळ उडाली. आज इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार होतं. पण सहकारी पक्षाच्या नवीन सूचनांनतर त्यामध्ये बदल करण्यासाठी लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत या लोगोचं अनावरण होण्याची शक्यता आहे. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरुद्ध लढण्यासाठी सामायिक अजेंडावर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ‘सूडाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘इंडिया’ची लोकप्रियता वाढत असल्याने सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तपास यंत्रणांचा दुरुपयोग करेल. देशातील शेतकरी, तरुण, महिला, उपेक्षित, मध्यमवर्ग, विचारवंत, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकारांसह समाजातील प्रत्येक घटकाला भाजपाच्या हुकूमशाही राजवटीचा फटका बसला आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीत ‘या’ नेत्यांचा समावेश
के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)
एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)
संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)
तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)
राघव चढ्ढा (आपचे खासदार)
जावेद खान (समाजवादी पक्ष)
लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)
हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
डी राजा (सीपीआय)
ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)
मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)