निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील काही धार्मिक स्थळे सैन्याच्या ताब्यात द्या – प्रकाश आंबेडकर यांची मागणी
मुंबई, १४/०९/२०२३: देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालीय. हिंदू धर्मियांच्या मतांचं ध्रुवीकरण करून आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
त्यामुळं निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि देशात शांतता राहावी, यासाठी पाच महत्त्वाची धार्मिक स्थळे सैन्याच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केलीय.
वाराणसीचं ज्ञानवापी मशीद, अयोध्या राम जन्मभूमी मंदिर, मथुरा शाही इदगाह, जम्मु कटरा येथील वैष्णोदेवी मंदिर, दिल्लीमधील स्वामीनारायण, अक्षरधाम मंदिर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष-आरएसएस धार्मिक ध्रुवीकरण करायची वृत्ती आहे. कदाचित तिला वाव मिळू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करतेय. निवडणुका होईपर्यंत ही सगळी मंदिरं सैन्याच्या ताब्यामध्ये देण्यात यावीत. निवडणुकीनंतर मग त्या-त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ती जातील. इलेक्शन हे धार्मिक स्वरूपाचं होऊ नये हाच आमचा हेतू आहे, असं ते म्हणाले.
दंगल घडवण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न :
गेल्या नऊ वर्षामधलं राजकारण बघता एखाद्या समाजावर अत्याचार करायचा. त्याच्यातून दहशत निर्माण होईल असा प्रयत्न करायचा, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या नावाचा वाद काढण्याच्या प्रयत्न या ठिकाणी झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं तो वाद त्या ठिकाणी थांबलाय. आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. म्हणजे देशांमध्ये अशांतता कशी राहील, याचा प्रयत्न सुरू असतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या माहितीवरून हिंदू धर्मीयांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाचे विधेयक नाही :
लोकसभेचं विशेष अधिवेशन ज्यावेळेस जाहीर झालं, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं आम्ही भूमिका मांडलीय की, हे फोटोसेशन आहे. जो काही अजेंडा काल बाहेर आलाय, त्यावरून असं दिसतंय की, कुठेही सिरीयस विधेयक नाही. राज्यसभेनं मंजूर केलेलं बिल लोकसभेमध्ये मंजूर करायचं, हा एवढाच फक्त अजेंडा आहे. त्यामुळं 2000 च्या नोटबंदीचा दुसऱ्यांदा निर्णय झाला, तर निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीय. या दोन्ही भूमिका आपल्याला 25 तारखेपर्यंत स्पष्टपणे समजतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
इंडिया आघाडीला सुद्धा विनंती करणार : इंडिया नावाचं विरोधी पक्ष म्हणून उभं राहिलेलं आहे. ही पाच मंदिरं इलेक्शन होईपर्यंत सैन्याच्या ताब्यात द्यावी, ही भूमिका इंडिया आघाडीने सुद्धा घ्यावी. तसा त्यांच्याकडे आग्रह धरत आहोत, या संदर्भात लवकरच आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहारही करणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले. तर या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा आलेली आहे. म्हणून ही दक्षता घेतली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.