‘तुम्ही मराठ्यांना फसवणार असाल तर तुमचा कार्यक्रम होणार’ – रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक
छत्रपती संभाजीनगर, २१ जून २०२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील आक्रमक झाले. आता मराठा समाजाची फसवणूक कराल तर त्याचे परिणाम भोगण्यास पण तयार राहा, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांना यावेळी जरांगे पाटील यांनी चांगलचं धारेवर धरलं. तुम्हाला आमचं वाटोळं करायचं आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्याकडं न्यायाधीश कशाला पाठवले होते? त्यांनी सगे सोयऱ्यांसह सगळे प्रश्न मार्गी लागतील असं सांगितलं. त्यामुळे आम्हाला सग्या-सोयऱ्याची जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे आरक्षण पाहिजे, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
तुम्ही मराठा समाजाला कितीही फसवा, मी मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण देणार आणि तुम्ही आरक्षण दिलं नाही तुम्हाला संपवणार असा थेट इशाराच जरांगे यांनी यावेळी दिला आहे. तुम्ही गोड बोलून फसवता का? आणि कार्यक्रम करता का? तुम्ही अगोदर फसवायचे पण तुमचा कार्यक्रम होत नव्हता, यापुढे तुमचा कार्यक्रमच होईल, असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.
मराठा आंदोलनाची दिशाही जरांगे पाटील यांनी सांगितली. त्यांनी त्यासाठी एक अटही राज्य सरकारपुढे ठेवली आहे. मी सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतर जीआर बघणार आहे. त्यामध्ये नोंद झाली आणि त्याच्या सग्या सोयऱ्याला आरक्षण मिळालं हे लक्षात आलं तरच मी आंदोलन बंद करणार आहे. नाही तर मी आंदोलन बंद करणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. आम्ही दोन टप्प्यात पाहणी, चाचणी केलेली आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात आम्ही चाचणी केली हे खरे आहे. सरकार असंच करत राहिलं तर २८८ उभे करायचे की पाडायचे, याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ विधानसभा आणि दुसऱ्या टप्प्यात ४३ विधानसभा अशी चाचणी झाल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.
६ जुलैपासून दौरा
मनोज जरांगे पाटील यांना आज गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर ते बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे होणाऱ्या एका धार्मिक सप्ताहास भेट देणार आहेत. यावेळी जरांगे पाटील यांना प्रवास करताना त्रास होत असल्याचे जाणवले. ६ जुलैपासून ते 13 जुलै पर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधणार, असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.