दारं बंद केली तर, पुन्हा उघडणार नाही; जरांगेंनी अल्टिमेम देत दिली डेडलाईन
जालना, १३ जून २०२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून, आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत. पण दारं बंद केली तर, पुन्हा दारं उघडली जाणार नसून, यावर उद्यापर्यंत (दि१४) निर्णय न झाल्यास संध्याकाळी ५ वाजता माझा निर्णय जाहीर करेल असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगेंनी राज्य सरकारला ही डेडलाईन दिली आहे.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल.” जरांगेच्या या इशाऱ्यानंतर मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी आज (दि.१४) राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मराठ्यांविरोधात षडयंत्र रचून मुख्यमंत्र्यांनाही बदनाम करण्याचे कारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.
राजकारण आमचा अजेंडा नाही. आम्हाला आमची लेकरे मोठी करायची आहेत यामुळे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा हीच आमची मागणी आहे मात्र दरवेळी सरकारकडून कार्यवाही सुरु आहे असं सांगण्यात येते. यामध्ये ओबीसी नेतेही खोडा घालत आहेत मात्र कुणबी हेच मराठा आहे आणि मराठा हेच कुणबी आहे हे समजून घ्यायला ते तयार नाही. आता काही नेत्यांना प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे ते अंतरवालीवरच बोलतात त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
…तर चांगला हिसका दाखवू
सरकार गोड बोलून मराठ्यांचा काटा काढण्याचे काम करत आहे. तातडीने मार्ग काढू म्हणायचे आणि कठोर आमरण उपोषणाचे दिवस वाढवायचे हा सरकारचा डावसुद्धा असू शकतो. जर सरकारने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाहीतर आम्ही चांगला कचका त्यांना दाखवू असेही जरांगे पाटील म्हणाले. तसेच जर राज्य सरकार आम्हाला खेळवत राहिले तर आम्ही विधानसभेच्या तयारीला लागू असा इशाराही त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.