प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही – पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

परळी वैजनाथ, दिनांक ११/०९/२०२३: मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहिण आहे. तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही. महाराष्ट्रानं, पक्षानं, जगानं समजून घ्यावं, प्रीतम मुंडे उचलून मी स्वःला बसवणार नाही अशा भावना व्यक्त करत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना विराम दिला.

४ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या शिव-शक्ती परिक्रमेचा समारोप आज झाला, त्यावेळी मतदारसंघातील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर त्या बोलत होत्या.

पंकजाताई म्हणाल्या, २०१९ मध्ये जेवढी माझी शक्ती होती, तेवढी २४ मध्ये असेल की नाही सांगता येत नाही पण प्रार्थना करते की मी जशी शुन्य झाले आणि नंतर स्वतःला घडवले तसं प्रीतमने स्वतःला निर्माण करावं. माझा तिला आशीर्वाद आहे.

शक्ती प्रदर्शन नाही..ही तर शक्तीचं:
शिव-शक्ती परिक्रमेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, स्वागत झालं. लोकांचं खूप प्रेम मिळालं. यात कसलंही शक्तिप्रदर्शन नव्हत तर ही शक्तीच होती, त्याचं प्रदर्शन मांडण्याची गरज नाही. राजकारण, समाजकारण करत असताना सत्व, तत्व, ममत्व मला महत्वाचे वाटतात, परिक्रमेचा धागा सात्विकतेच्या धाग्याने जोडला होता. परिक्रमा केवळ परिक्रमा नाही तर पराक्रम ठरणार असा विश्वास पंकजाताईंनी व्यक्त केला.

शिव-शक्ती परिक्रमा मुंडे साहेबांना समर्पित:
कितीही मोठं झालं तरी गरीबांविषयी सेवेची भावना ही मुंडे साहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्यांचं नाव हिच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे, आम्हा तिघी बहिणींना त्यांनी वाढवलं, चांगले संस्कार केले हे सांगताना त्यांना क्षणभर गहिवरून आलं. ही परिक्रमा त्यांना समर्पित करते. एक समाज म्हणून एका उंचीवर जाऊन मुंडे साहेबांनी वंचित, पिडित घटकांसाठी जे काम केलं तसं करायची शक्ती मला मिळाली आहे ती मी पेलावी अशी प्रार्थना करते.

जिंकले तर इतिहास घडेल:
मला जग जिंकू द्या. बारीक सारीक गोष्टीत पाडू नका. मला मोठं काम करू द्या, तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुमची सेवा करत राहील. मोठी स्वप्न बघा, मोठी स्वप्न जगा, मोठा आशीर्वाद द्या, तो माझ्यासाठी महत्वाचा आहे असं सांगून पंकजाताई म्हणाल्या, मी जिकंले तर इतिहास घडेल आणि जिंकू नाही दिले तरीही इतिहास घडेल. माझी भूमिका कधीच अयशस्वी ठरणार नाही. आता इलेक्शन तोंडावर आलंयं, आता एक एक अंश व्हायचयं आपल्या हया शक्तीचा..आपल्याला उज्ज्वल भविष्य घडवायचयं, त्यासाठी पाठिशी उभं राहून आशीर्वाद द्या.