जो पर्यंत माझ्या जीवात जीव तो पर्यंत मी राष्ट्रवादीतच: अजित पवार
मुंबई, १८ एप्रिल २०२३ : माझ्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, असे सांगत अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरु असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. आपण सातत्याने माझ्याबद्दल बातम्या देत आहात, त्यामध्ये यत्किंचित तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी आज नेहमीप्रमाणे ऑफिसला बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेहमीप्रमाणे कमिटीच्या मिटिंगला आले होते. त्यांची मंत्रालयात कामं होती. मी इकडे होतो म्हणून ते मला भेटायला आले. या आमदारांची माझ्याकडे काही कामं असतात. मात्र, गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण त्यांनी काळजी करु नये. राजकारणात अनेक चढउतार येतात. महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, आता कोणतेही गैरसमज पसरवू नका. आता या विषयाचा तुकडा पाडा. हा विषय इथेच संपवा, असे अजित पवार यांनी म्हटले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप