पैशांचा वापर करून मला पाडलं, आता गद्दारांना पाडण्यासाठी विधानसभा लढणार: चंद्रकांत खैरेंनी थोपटले दंड
छत्रपती संभाजीनगर, २५ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीत सगल दुसऱ्यांदा झालेला पराभव चंद्रकांत खैरेंच्या(चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवून कमबॅक करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. नुकतंच त्यांनी याबाबत मोठं विधान केलं. आता विधानसभेची निवडणूक लढवून गद्दारांचा पराभव करणार असल्याच चंद्रकांत खैरेंनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी छत्रपती संभाजी नगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? याबाबत खैरेंना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जर आदेस दिला तर मी नक्कीच विधानसभा निवडणुक लढवणार आहे. बाहेरच्या कुणाला तरी तिकीट देण्याऐवजी आपला माणूस तिकडे नाही का? हे पाहिलं जाईल. मी एकनिष्ठ आहे आणि तो गद्दार आहे. एकनिष्ठ गद्दाराला पाडू शकतो. मला गद्दारांना पाडायचंचं आहे, असं खैरे म्हणाले.
माझ्यामुळे या ठिकाणी गद्दार निवडून आले. कारण मी त्यांच्या मतदानासाठी प्रचार केला. जे फुटले त्याचं आम्हाला दु:ख आहे. गद्दार सध्या नाटकं करत आहेत. आता जर गद्दारांना पाडायचं असेल तर मी निवडणूक नक्कीच लढेन, मी १९९० मध्ये आमदार झालो, १९९५ मध्ये आमदार झालो. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला दिल्लीला पाठवले. मी २० वर्षे दिल्लीत होतो. यावेळी या ठिकाणी धोका झाला. जे आत्ताचे गद्दार आहेत, त्यांना पैशांची मस्ती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरने पैसे आले. पोलिस आयुक्तांनी याकडे लक्ष दिले नाही. पैशाचा वापर करून मला लोकसभेला पाडण्यात आलं, असा आरोपही खैरेंनी केला.
महायुतीला धूळ चारू
आगामी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीच्या बळावर आम्ही महायुतीला धूळ चारू, असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला.