जे’गद्दार’ असतील त्यांना ‘गद्दार’ म्हणायची ताकद माझ्यात… खासदार सुप्रियाताई सुळे
मुंबई दि. २० जून २०२३- या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
दरम्यान ‘महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा’… ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे ‘गद्दार’ असतील त्यांना ‘गद्दार’ म्हणायची ताकद माझ्यात आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे बोलायला इतके पक्के आहेत की, त्यांनी कॅमेर्यासमोर ‘पन्नास खोके’ तुम्हाला हवेत का… अशी ऑफर दिली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितले पाहिजे की, तुमच्या सरकारमधील मंत्रीमंडळातील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात मोदीजी तुम्ही बोलला होतात ‘न खाऊंगा ना, खाने दुंगा’ याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली.
आज टिव्ही आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या व पाहिल्यानंतर लक्षात आले की, आज २० जून म्हणजे गद्दार दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ज्या घटना घडल्या. त्या घटनेला टिव्हीवर ‘गद्दार दिवस’ म्हणत आहेत हे पाहिले असे स्पष्ट करतानाच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘गद्दारी’ केली असे काहीजण म्हणत आहेत तर त्याच उध्दव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते हे विसरले का? असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.