मलाच लाज वाटते की मी एकेकाळी यांच्यासोबत फिरत होतो – आदित्य ठाकरे
सिंधुदुर्ग, १ आॅगस्ट २०२२: ” महाराष्ट्राला गद्दारांचे चेहरे माहित आहे. आम्हाला प्रचार करायची गरज नाही महाराष्ट्रच प्रचार करेल. गुवाहाटीमध्ये जेव्हा हे ४० गद्दार होते, तिथे खात पित होते, त्यावेळी या गद्दारांना आसाममध्ये आलेला पूर दिसला नाही का? गोव्यामध्ये जेव्हा हे टेबलवर नाचत होते, हे लोक तुमचा चेहरा होणार? मलाच लाज वाटते की मी एकेकाळी यांच्यासोबत फिरत होतो,” अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या अटकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून, शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांचा मतदारसंघ असलेल्या सावंतवाडीमध्ये त्यांनी आज सभा घेतली.यावेळी त्यांनी बंडखोर गटावर जोरदार निशाणा साधला
ठाकरे म्हणाले, ” एका गद्दाराचा मला मेसेज आला गद्दार म्हणून नका विश्वास घातकी बोला. एका गद्दाराचा माझासोबत असलेल्या व्यक्तीला हा मेसेज आला. महाराष्ट्राला गद्दारांचे चेहरे माहित आहे.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
केसरकर म्हणाले की, “त्यांनी नक्की दौरा करावा माझ्या मतदारसंघात जाऊन माझ्या जनतेशी खोटं बोलत असतील तर मला बोलावं लागेल. जी सहानुभुती मिळवली जाते ती चुकीचे आहे. आम्ही भाजप आणि सेना युतीत निवडून आलो. त्यांनी जनतेसमोर जायला हवं. मला ठाकरे कुटूंबाबद्दल आदर आहे. संघटना बुडत असताना त्यांचे वारस आरोप करत बसलेत.”