मी फिक्स मॅच पाहत नाही- देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला
मुंबई, दि. २६/०७/२०२२: शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखत देउन भूमिका स्पष्ट केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना मी फिक्स मॅच पाहत नाही, लाईव्ह मॅच मी पाहत असतो. ती पाहून प्रतिक्रिया द्यायची असते, असा टोला लगावला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामाना दैनिकात सडेतोड मुलाखत देउन तोफ डागली होती. त्यावर राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे. या मुलाखतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत, मी फिक्स मॅच पाहत नसल्याचा टोला लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेकांवर टीका टिप्पनी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्युत्तरही देण्यात येत आहेत. मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रसिद्ध केला जाणार असून त्यामध्येही कोणावर टीकास्त्र करण्यात आले आहे, याबाबत चर्चेला उधाण आहे.