संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी: नाना पटोले
मुंबई दि. ३० जानेवारी २०२३: दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या वारकरी संत परंपरेमधील महान संत आहेत. सतराव्या शतकात त्यांनी अभंग आणि किर्तनाच्या माध्यमातून भक्ती आणि समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना गुरुस्थानी मानत होते. संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी आणि महाराष्ट्रासाठी संत तुकाराम महाराज वंदनीय आहेत. त्या संत तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले, असे बेताल वक्तव्य करून भंपक भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्री याने समस्त वारकरी संप्रदायाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यामुळे या भोंदू बाबाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर येथे येऊन या भोंदू बाबाने दिव्य दरबाराच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्योग केला होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी आव्हान दिले असता या भोंदू बाबाने नागपूरातून पळ काढला होता. या पळपुट्या भोंदू बाबाचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून त्याने संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.