सत्तेत असताना आंदोलने कशी काय करता – मुख्यमंत्री शिंदेचा अजित पवार गटातील आमदारांनी प्रश्न
मुंबई, 06 नोव्हेंबर २०२३ : सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही, अशा आंदोलनांमुळे महायुतीत समन्वय नाही असा संदेश जाऊ शकतो, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांना समज दिली आहे. अजित पवार गटातील आमदार निलेश लंके आणि आमदार राजू नवघरे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी ३१ ऑक्टोबरला मंत्रालयाबाहेर आंदोलन केले होते. सत्तेत असतानाच अशी आंदोलन केल्याने मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते.
आज महायुतीच्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या आमदांना समज दिली आहे. सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही, अशा आंदोलनांमुळे महायुतीत समन्वय नाही असा संदेश जाऊ शकतो, असं शिंदे यांनी या आमदारांना सांगितले असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला. यात शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके, काँग्रेसचे परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर, भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश आहे.
याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके, राजू नवघरे आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, अशी भूमिका घेत या आमदारांनी उपोषण सुरू केले होते. यानंतर पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेत मंत्रालय परिसराबाहेरील वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावरुनच मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे वृत्त होते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप