गुलाबराब पाटीलांची आदित्य ठाकरेंवर टिका, म्हणाले ‘तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून काम करतोय’

मुंबई,दि.०५/०९/२०२२: “३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असे म्हणत गुलाबराव पाटीलांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवा विषय मिळाला आहे. शिवसेना आणि शिंदेगटातील वाद चांगलाच वाढला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

 

पाटील म्हणाले, “शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत तर मार खाणारे देखील आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतोय, “मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

पाटील पुढे म्हणाले, “आम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना असेदेखील सुचवले की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा तर कदाचित सरकार वाचू शकेल. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उडाले ते कावळे राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली.”

 

राऊत यांना आवरा असे म्हणत चहा पेक्षा किटली गरम अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. ते म्हणाले, “३५ वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते. कोण संजय राऊत? आमदाराने मत दिली म्हणून ते खासदार झाले,” असे म्हणत पाटील यांनी राऊतांवरही टीका केली.