महारेराच्या ‘महाकृती’ या नवीन संकेतस्थळाच्या प्रभावी वापरासाठी मार्गदर्शक व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध, वापरकर्त्यांसाठी प्रशिक्षणही सुरू

मुंबई, दिनांक 4 सप्टेंबर 2024: महारेराचे नवीन संकेतस्थळ ‘महाकृती’ 1 सप्टेंबरच्या पहाटे 00 पासून सुरू झालेले आहे. या संकेतस्थळाचा सर्वांना प्रभावीपणे वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

याशिवाय आधी जाहीर केल्यानुसार संकेतस्थळ सुरू झाल्यापासून दोन आठवड्यापर्यंत ऑनलाईन प्रशिक्षणही सुरू असून याकाळात सर्व भागधारकांच्या शंकांचे पूर्ण निरसनही करण्यात येत आहे. यात तक्रारदारांसाठी , वकिलांसाठी तक्रारी कशा नोंदवाव्या आणि त्याची पुढील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. विकासक, प्रवर्तक, त्यांच्या स्वयंविनियामक संस्था यांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी , गरजेनुसार दुरुस्ती, नूतनीकरण, त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक प्रगती अहवाल, प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल चे प्रपत्र 4 या नेहमीच्या कामांसाठी संकेतस्थळाचा वापर प्रभावीपणे कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे .स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसनाही त्यांची नोंदणी, दुरुस्ती, नूतनीकरण अशा त्यांच्या नेहमीच्या कामांबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. एकूण या सर्व भागधारकांना ही कामे करताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जात आहे.

आतापर्यंत या प्रशिक्षणाचा सुमारे 550 विकासक/ प्रवर्तक, 350 एजंटस आणि 250 च्यावर वकिलांनी आणि तक्रारदारांनी लाभ घेतलेला आहे.

आतापर्यंत 2766 नियमित संकेतस्थळ वापरकर्त्यांनी नवीन संकेतस्थळावर लाॅग इन करून त्यांचे पासवर्ड्स बदलले. 581 प्रवर्तकांनी त्यांची संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करून 8 प्रवर्तकांनी नवीन प्रकल्पासाठी नोंदणी केली आणि एकाने नुतनीकरणासाठी अर्ज केला.

शिवाय नवीन एजंटस नोंदणीसाठी 21 जणांचे अर्ज आले असून 6 एजंटसनी नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. 84 एजंटसनीही नवीन संकेतस्थळावर त्यांची माहिती अद्ययावत केली आहे. 17 ग्राहकांनी नवीन संकेतस्थळावर तक्रारी दाखल केल्या आहेत.