महिलांना परवाने द्या, मी रिव्हाल्वर देतो: शिंदे गटाच्चा नेत्याचे वादग्रस्त विधान
अमरावती, २६ आॅगस्ट २०२४: कोलकाता आणि बदलापूर घटनेचा देशभरात निषेध केला जात असून ठिकठिकाणी आंदोलन केल्या जात आहेत. अमरावती येथे हिंदू संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलण्याच्या ओघात शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महिलांना त्यांची सुरक्षा करण्यासाठी परवाने द्या, मी त्यांना रिव्हाल्वर देतो, असे वादग्रस्त वक्तव्य नेभनानी यांनी केले.
बांगलादेशात हिंदू समाजाबरोबर काय घडत आहे ते आपण पाहत आहोत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य कारवाई करतील, याचा आम्हाला विश्वास आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना रिव्हाल्वर वापरण्याची परवानगी द्यावी. अमरावतीत मी त्यांना रिव्हाल्वर घेऊन देतो. दोन-चार माणसं मेली तर हरकत नाही. न्यायालयाचा खर्चही करायला मी तयार असल्याची स्फोटक विधाने नेभनानी यांनी केली. नानकराम नेभनानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटचे मानले जातात. ते शिवसेना शिंदे गटाचे मुख्य समन्वयक तसेच शिवसेना प्रणित सिंधी समाज राज्य संघटक आहेत. जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.