माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आप प्रवेश
पुणे, २३/०८/२०२२: यवतमाळात बदलाचे वारे
यवतमाळ- माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिवसेनेच्या मित्रत्वाला ‘जय महाराष्ट्र’ करत रविवारी ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. राठोड यांनी ‘झाडू’ हाती घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
भाजप, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करीत राठोड आता ‘आप’मध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत रिपाइंचे तत्कालीन उपाध्यक्ष धनराज वंजारी, यवतमाळचे भाई अमन यांनीही आपमध्ये प्रवेश केला. भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत होते. यवतमाळमध्ये सध्या आपची काहीही ताकद नाही. मात्र तरुणाई अरविंद केजरीवाल यांची चाहती आहे. त्यामुळे राठोड यांनी योग्य नियोजन केल्यास ‘आप ‘ हा भाजप, शिवसेना, काँग्रेसला पर्याय ठरू शकतो. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले होते.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघात राठोड यांनी दावेदारी करू नये म्हणून काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राठोड यांना विधान परिषदेवर पाठविण्यात भूमिका बजावली. राठोड यांच्या सहा वर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांचा किती फायदा झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा. २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर हरिभाऊ राठोड हे शिवसेनेत गेले होते.