४० दिवस ,सरकार झोपले होते का ? मनसे आमदाराचा सवाल
कल्याण, २६ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने आरक्षणावर काहीच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अन्न आणि औषधही घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारची कोंडी केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कडक शब्दांत राज्य सरकारला सुनावले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तीस दिवसाची मुदतमागितलेली असताना जरांगे पाटील यांनी ४० दिवसाची मुदत दिली. पण या मदतीत आरक्षण देता आले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून त्यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू सुरू केले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोनवर बोलून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या अशिष्ठायला यश आलेले नाही त्यातच आता मनसेने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
राजू पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागेही बोलले होते की सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का देत नाहीत. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं की काही दिवसात आरक्षण दिलं जाईल त्यांनी तो वेळ दिला होता. त्यावेळेस यांनी का झोपा काढल्या. आता टोकाशी आल्यावर त्यांना सांगतात उपोषणाला बसू नका. दोन पावलं मागे घ्या अजून वेळ द्या. पण, हे प्रकार का होतात असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आता टिकणारं आरक्षण द्यावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु, फक्त तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केली.