महायुतीचा पुण्यातील पहिला मेळावा रविवारी, अजित पवारांचे मार्गदर्शन
पुणे, ११/०१/२०२४: भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस – (अजित पवार गट) या तीन पक्षांच्या महायुतीच्या जिल्हानिहाय सभा महाराष्ट्रभर १४ जानेवारी रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचा पहिला मेळावा रविवारी (ता. १४) पुणे शहरात म्हात्रे पुलाजवळ होणार आहे. यामध्ये पालकमंत्री अजित पवार हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुती होऊन सहा महिने होत आले तरीही अद्याप शहरात एकही संयुक्त मेळावा झाला नव्हता. कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान अजित पवार गट युतीमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे हा महायुती म्हणून जिल्ह्यातील पहिलाच मेळावा ठरेल.
तिन्ही पक्षात समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभर १४ जानेवारी रोजी महायुतीचे मेळावे होणार आहेत. यामध्ये युतीतील इतर घटक पक्षांचाही समावेश असेल.
महायुतीच्या नियोजित मेळाव्याच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुणे शहरात पार पडली. यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालय येथे दुपारी चार वाजता होणार आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांपैकी एकजण उपस्थित राहणार आहेत, असे शहराध्यक्ष धीरज घाटे, दीपक मानकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा लोकसभा दौरा नुकताच पार पडला. त्यांनी कार्यकर्त्यांना बूथ सक्षमीकरणासह नमो ॲपद्वारे कामाला लावले आहे. तसेच अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा जिल्ह्यात पार पडल्या आहेत.
भाजप कार्यकर्त्यांनी दादांचे मार्गदर्शन ?
महायुतीच्या मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यात तेथील पालकमंत्री मार्गदर्शन करतील असे महायुतीच्या नियोजनानुसार ठरलेले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपने अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे महायुतीचा पहिल्या मेळाव्यात अजित पवार गटासोबतच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना अजित दादांचे मार्गदर्शन ऐकून त्यानुसार पुढील काम करावे लागणार असे सध्याचे चित्र आहे