अखेर ठरल, शिंदेंचा निर्णय झाला

मुंबई, ५ डिसेंबर, २०२४ ः गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणूक निकालांवर मोठी चर्चा पाहायला मिळाली. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे मानलं जात होतं. पण यातलं काहीही महायुतीकडून अधिकृतरीत्या जाहीर केलं जात नव्हतं. अखेर दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्यासोबत अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हेही नक्की झालं. पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत संदिग्धता कायम असल्याचं दिसून आलं. गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या अनेक भेटीगाठी, बैठका आणि राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं मान्य केलं आहे.

“आज साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती की कोणत्याही स्थितीत त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला हवं. शिवसेना आमदार, शिवसैनिक, महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं. आम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलो होतो. त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचं पत्र आम्हाला त्यांनी दिलं. ते आम्ही आता राजभवनावर येऊन प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे”, असं शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं.

“या प्रक्रियेत कोंडी अजिबात नव्हती. देवेंद्र फडणवीस असो किंवा आम्ही माजी मंत्री असोत, शिवसेनेचे पदाधिकारी-खासदार असोत, आम्हा सगळ्यांची इच्छा होती की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये असणं आमच्या दृष्टीने आवश्यक होतं. आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना तशी विनंती केली होती. एकनाथ शिंदेंनी संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं काम करायचं आणि इतर कुणालातरी संधी द्यायची हा विचार केला होता. पण हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती. ती आज एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत”, असंही उदय सामंत म्हणाले.