मला अडकवता येत नसल्याने फडणवीसचा हा डाव: अटक वॉरंटवरून जरांगेंचा हल्लाबोल

जालना, २४ जुलै २०२४: मी काहीही केलेले नाही मात्र मी कशाचाच अडकत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसने हा एक डाव टाकला आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मी काहीही केलेले नाही. मात्र मी कशाचाच अडकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसनेहा एक डाव टाकला आहे. आम्ही शंभूराजे महानाट्य दाखवलं होतं. ही दहा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याचे पैसे देखील आम्ही दिले होते. मात्र एवढ्या वर्षांमध्ये या प्रकारावर कोणतीही कारवाई झाली नाही. आताच ही कारवाई का होत आहे? कारण हे देवेंद्र फडणवीसने केलेले कारस्थान आहे. असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

मराठा आरक्षणासाठी लढाई लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील हे नाट्य निर्मात्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर न राहिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह दोघांना अजामिनपात्र अटकेचे वॉरंट काढण्यात आले आहे. पुणे न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०२३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते. मात्र, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.