फडणवीसनची चाल धनगर आरक्षणाचा वाद मुख्यमंत्र्यांकडे ढकलला
पुणे, 21 सप्टेंबर 2023 ः धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखविल्यानंतर या प्रश्नातून नक्कीच मार्ग निघेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले. धनगर आरक्षण देण्यात राज्य सरकारला विलंब होत असताना यातून फडणवीस यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या प्रश्नात थेट मुख्यमंत्र्यांकडे बोर्ड दाखवले आहे त्यामुळे मुख्यमंत्री यात अडकतील अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देत “श्रीं’चे दर्शन घेतले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची आरती फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांनी फडणवीस यांचा सन्मान केला. आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले,””पूर्वी जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर तेथेही सुरवातीला पाच वर्ष पुरुषांचाच वावर जास्त होता. पण काही काळ गेल्यानंतर हे चित्र बदलले. संसदेत आत्ता देखील ८५ महिला आहेत, आरक्षणामुळे त्यामध्ये आणखी १०० महिलांची भर पडेल. त्यातूनच महिला अधिक सक्षमपणे काम करतील, हे निश्चित आहे.”
मुंबईतील लालबागच्या राजा गणपती मंदिर परिसरात पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतो. तरीही गर्दीवर नियंत्रणात येत नाही. यापुढे त्याबाबत पुरेशी काळजी देखील घेतली जाते. पोलिस बंदोबस्त वाढवून योग्य खबरदारी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुण्यात दरवर्षी मी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतो. गणेशोत्सव व पुण्याचे वेगळे नाते आहे. सार्वजनिक गणेशोत्सव जगभरात पोचविण्याचे काम पुण्याने केले आहे. गणरायाचा आशीर्वाद पुण्यासह राज्याला मिळेल, असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्रावरील विघ्न दूर व्हावेत, हेच साकडे मी गणरायाला घातले आहे, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.