फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्याच डोक्यावर झालाय परिणाम – मनोरुग्ण म्हणल्याने दिले प्रत्युत्तर
मुंबई, १० फेब्रुवारी २०२४: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोरुग्ण असा उल्लेख केल्याने यावरून वाद पेटला आहे. फडणवीस यांनी त्यास प्रत्तुत्तर दिले आहे. उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका केली.
“फडणवीसांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच शंका सध्या येत आहे, सरकारच जर खुन्यांच्या मागे उभे राहिले तर राज्यात गुन्हेगारी घटना वाढतील “अशी टीका आज (१० फेब्रुवारी) पत्रकार परिषदेतून ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरेंच्याच डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका केली.
फडणवीस म्हणाले, उद्धवजींची भाषा आणि शब्द ऐकल्यानंतर माझे ठाम मत आहे की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी त्यांच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. मी त्यांना केवळ ‘गेट वेल सून’ एवढेच म्हणेन. उद्धवजी आता काहीही म्हटले तरी मी आता ते लवकर बरे व्हावेत म्हणून केवळ ‘गेट वेल सून’ एवढ्याच शुभेच्छा देतो.
फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – उद्वव ठाकरे
दरम्यान, ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक म्हटलं, फडतूस म्हटलं. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शब्द देखील कमी पडत आहेत. हे अत्यंत सौम्य शब्द आहेत. असं वाटत आहे की, त्यांची मानसिक तपासणी करायला हवी. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संताप जनक प्रतिक्रिया होती.राज्यात अशा प्रकारे कायद्याची धिंडवडे निघत असताना संबंधित मंत्री जबाबदार असतो. तसेच संबंधित मंत्र्याकडून कारभार व्यवस्थित होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला हवं. मात्र ते स्वतःच गुंडांना पोसत आहेत. मात्र त्यांच्या कोणामध्येच एकमेकांकडे बोट दाखवण्याची हिंमत नाही. कारण ते स्वतःच झाकून ठेवत दुसऱ्यांचा वाकून बघत आहेत.