महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही – शरद पवारांनी केली फडणीसांची पाठराखण
पुणे, ११ जानेवारी २०२५: परभणी आणि बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूमुळे राज्यभरात असंतोष असल्याचं पहायला मिळतंय. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही, असे स्पष्ट केले आहे.
साहित्य परिषदेत आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युमुळे पसरलेल्या असंतोषाविषयी बोलताना ते म्हणाले की, परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली पाहिजे, याबाबत त्यांच्याशी बोललो आहे. आपले राजकीय विचार वेगळे असतील, पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही, असं पवार म्हणाले.
शरद पवारांनी फुले-शाहु-आंबेडकारांचा विचार पुढे नेण्याचे काम केलंय. शरद पवारांनी जशी ना.धो. महानोरांना विधानपरिषदेवर संधी दिली, तशी पंडित जवाहरलाल नेहरुंनी कवी दिनकर यांना राज्यसभेवर संधी दिली होती. तर एकदा पंडित नेहरुंना कवी संमेलनाला आमंत्रित करण्यात आलं. स्टेजवर जाताना पंडित नेहरुंचा पाय घसरला तेव्हा कवी दिनकर यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पडण्यापासुन वाचवलं. तेव्हा पंडित नेहरु म्हणाले की कवीराज राजकारणात जर माझ्यासकट कुठल्याही राजकारण्याचा पाय घसरला तर आम्हाला असेच सावरा. पंडित नेहरुंनंतर साहित्यिकांना जर असं सांगण्याच धाडस जर कोणात असेल तर ते शरद पवारांमध्ये आहे, असं रावसाहेब कसबे म्हणाले.