तिघांची बेरीज केली तरी, दुप्पट यश भाजपाला; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. अनेक ठिकाणी जोरदार चुरस दिसून आली. अनेक दिग्गज राजकारणांनी आपल्या ग्रामपंचायती राखल्या. तर काही ठिकाणी दिग्गजांना जोरदार धक्के बसले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील नेते आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करत साडेसातशेहून अधिक जागा जिंकून भाजप नंबर एक पक्ष ठरला असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या १४०० हून अधिक ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात अतोनात सूड उगविणार्‍या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांचेही अभिनंदनही फडणवीस यांनी केले आहे. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन ! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप