लोके मेले तरी चालतील पण सत्तेत बसणे हीच भाजपची प्रवृत्ती: नाना पटोले
मुंबई, १६ ऑगस्ट २०२३: देशात आणि राज्यात लोकं मेली तरी चालतील, पण सत्ता कायम राहली पाहिजे, ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडियाच्या बैठकीसंदर्भात आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी मुंबईत होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या महत्त्वाच्या बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे, त्याच्या तयारीवर चर्चा झाली. मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीतून देशाला दिशा मिळेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरू होत असून या पदयात्रेची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या बैठकीत ४८ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांच्या अहवालावरही चर्चा करण्यात आली. केंद्रात आणि राज्यातील भाजपची सत्ता उखडून काँग्रेसला सत्तेवर आणणं हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारसरणीचे राज्य आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मिळून लोकसभा निवडणूक लढवल्यास ४०-४५ जागा जिंकता येतील, असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू आहे.
आमचे लक्ष्य भारतीय जनता पक्ष आहे, जे पक्ष सोबत येतील, त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. शेतकरी, तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत, व्यवसाय बंद आहेत, पुण्यात २१८ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या इतर भागातही हीच परिस्थिती आहे, पण लोकं मेली तरी चालतील, पण सत्ता कायम राहली पाहिजे, ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपची प्रवृत्ती आहे.
शरद पवार निर्णय घेण्यास सक्षम
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शरद पवार यांच्याबाबत काँग्रेसमध्ये कोणताही संभ्रम नसून लोकांमध्ये संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते निर्णय घेण्यास सक्षम आहेत, त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आपण इंडिया आघाडीतच राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत, ते मुंबईतील इंडिया बैठकीदरम्यान शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
पंतप्रधानांनी जनतेच्या जखमेवर मीठ चोळले
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई ही परकीय परिस्थितीमुळे आहे आणि ती आम्ही वाढवली नाही, असं खोटं सांगितले. मोदी सरकार देशाची आर्थिक परिस्थिती हाताळू शकले नाही, त्यामुळेच महागाई वाढली, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतोय, पण महागाईचे खापर मात्र, परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले. जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मोदी सरकारने केले आहे. या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे, सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. लोकांमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड रोष आहे, मात्र मोदी पुन्हा येणार अशी घोषणा करतात, असा उद्दामपणा लोकशाहीत चालत नाही, असेही पटोले म्हणाले.