सरकारमध्ये सहभागी झालो तरी काहीच फरक वाटत नाही – अजित पवार यांचे वक्तव्य

मुंबई, १७ जुलै २०२३: अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी रविवारी ( १६ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( १७ जुलै ) पुन्हा अजित पवारांसह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानंतर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. ही बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

अजित पवार म्हणाले, “उद्योग, वैद्यकीय शिक्षण आणि अन्य विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. माझी कामाची पद्धत वेगळी आहे. काम होत असेल, तर करायचे. नसेल होत तर होणार नाही म्हणून सांगायचे. पण, आज सात ते आठ आमदारांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आधी विरोधी पक्षात होता, आता सरकारमध्ये आलात. काय फरक जाणवतो? प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी म्हटलं की, “मला काही फरक जाणवत नाही. मी विरोधी पक्षात असताना सुद्धा काम करत होतो. मागे सत्ताधारी पक्षात असताना काम केलं आहे. जनता, लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवत राज्याचा विकास करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारमधील एक घटक म्हणून काम करतोय.”
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “अजित पवार आणि विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. रविवारी आमदार मतदारसंघात होते. अधिवेशन सुरु झाल्याने आमदार मुंबईत आहेत. आम्ही माहिती काढल्यावर शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला येणार असल्याचं समजले. म्हणून आम्ही येथे आलो.”
“शरद पवारांना भेटून आम्ही आशीर्वाद घेतला. रविवारप्रमाणे आजही पक्ष एकसंध राहण्याबाबत विनंती केली. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मनात आता काय आहे, हे मी सांगू शकत नाही,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.