मिलिंद देवरा नंतरही काँग्रेसला गळती लागणार – अनेक नेते भाजप, शिवसेनेच्या संपर्कात
मुंबई, १५ जानेवारी २०२४: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतच कॉंग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता इतर काँग्रेस नेत्यांचीही भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला जाईल अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु केला असताना काँग्रेसमध्ये महत्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याचे चित्र आहे.
देवरा यांनीच आपल्यासोबत नसीम खान यांनाही घेऊन येण्याची तयारी केली आहे. गत विधानसभेला शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला होता. लांडे आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे नसीम खान यांना मतदारसंघ राहिला नाही. शिंदे गटात आल्यास विधान परिषदेवर संधी मिळेल. मंत्रिपदही मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. आपण मंत्री होणार असून शिवसेनेत जात आहोत, असे स्वतः नसीम खान सांगत असल्याची माहिती एका कॉंग्रेस नेत्याने दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे दुसरे कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे देखील भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. पण आता बसवराज पाटील यांना उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. लिंगायत समाजाच्या मतांच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो, असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याचे बोलले जाते.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मिलिंद देवरा यांनी काल अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेकडून शिवसेना गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी दोन बडे नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.