एमटीडीसी सोबत लुटा वर्षा पर्यटनाचा आनंद, मिळणार खास सोयी आणि सवलती…
पुणे, २८/०६/२०२३: आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, शुभ्र खळखळत फेसाळणारे झरे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, आल्हाददायक गुलाबी थंडी आणि वर्षा-पर्यटन हे अनुभवायचं असेल तर पर्यटनाला जावंच लागेल…..
अरबी समुद्रात रेंगाळलेल्या पावसानं थोडी गती घेतली कि हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता यासाठी पर्यटन करायचंय, मग या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निसर्गरम्य ठिकाणं आपणास साद घालीत आहेत.
फक्त शासनानं दिलेल्या सुचनांच पालन करायचं आणि धोकादायक ठिकाणी न जाता पर्यटनाचा आनंद लुटायचा….
वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे आणि निसर्गरम्य परिसरात असलेली जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे ……
निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य डोंगर रांगा आणि थंड हवेची ठिकाणे तसेच जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. महामंडळाची छत्रपती संभाजीनगर विभागातील अजंठा येथे अजंठा टी पॉईंट आणि फर्दापुर, लोणार येथील पर्यटक निवास आणि लवकरच पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असलेले पर्यटक निवास वेरूळ ही पर्यटक निवासे निसर्गरम्य परिसरात आहेतच, त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळांच्या जवळ आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले आणि अनुपम केलेचा उत्कृष्ट नमुना असलेली अजंठा लेणी, संपुर्ण एका दगडामध्ये कोरलेली वेरुळची मंदीरे आणि लेणी, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर, ही ठिकाणं आणि इथं असणारी निसर्गसंपदा, धबधबे यांच सौदर्य डोळयांत साठविण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या सर्व पर्यटकांच्या आरामदायी वास्तव्याची आणि चवादर भोजनाची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये करण्यात येत आहे. महामंडळाची ही पर्यटक निवासे वर्षा पर्यटनासाठी सर्वतोपरी सज्ज करण्यात आली असुन याठिकाणी पर्यटकांना सर्व सोयी उपलब्ध होतील याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. तथापि, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासुन सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरडया धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असुन त्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत.
नयनरम्य अशा मनोहारी लोणार सरोवराच्या सानिध्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास लोणार असुन या ठिकाणी 8 अद्ययावत असे वातानुकुलित सुट पर्यटकांना सेवा देत आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या परिसरामध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासात चवदार भोजनाची सोय करण्यात येत आहे. अजंठा लेण्यांच्या पसिरात आणि जवळच फर्दापुर येथे महामंडळाकडुन आरामदायी अशा कॉटेज बांधलेलल्या आहेत. लेण्यांपासुन जवळच असल्याने सदरची पर्यटक निवासांचे पर्यटक मोठया प्रमाणावर आरक्षण करताना दिसत आहेत. सदर पर्यटक निवासांच्या ठिकाणी प्री-वेडींग फोटोशुट, डेस्टिनेशन वेडींग, कंपन्यांच्या कॉन्फरन्स यासाठी महामंडळाकडुन सोय करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अशा निसर्गरम्य वारसा स्थळांच्या ठिकाणी कॉन्फरन्स घेण्यासाठी वेगवेगळया कंपन्या नियोजन करीत असुन अशा कंपन्यासाठी महामंडळ एकत्रित रूम बुकिंगवर सवलत देत आहे. डेस्टिनेशन वेडींगसाठीही महामंडळ खास सवलत देत असुन निसर्गाच्या सानिध्यात विवाह करण्यासाठी आणि या आठवणी यादगार करण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.
महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्येही सुसज्ज असे 83 सुटचे पर्यटक निवास आहे. या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग साठी खास लॉन ची सोय करण्यात आली असुन सुसज्ज असा कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचीही सोय करण्यात आली आहे.
सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत असुन पर्यटकांनाही धोकादायक ठिकाणी वर्षापर्यटनास न जाण्यासाठी सुचना देण्यात येत आहेत.
कोसळणारा पाऊस, आल्हाददायक कानात शिळ घालणारा वारा आणि दाट धुक्याच्या दुलईमध्ये चिंब भिजत निसर्गाचा आनंद घेण्याचे हे गुलाबी क्षण यादगार करण्यासाटी पर्यटकांची चढाओढ सुरु आहे. आपणही या अनोख्या वातावरणामध्ये वर्षा पर्यटनाचा धुक्याच्या आणि उबदार थंडीच्या साथीने आनंद घ्यावा, असे महामंडळाने आवाहन केले आहे.
जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 15/20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी “टुर पॅकेजची” सुरवात केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत. सोयी सवलतींमुळे आणि वर्षा ऋृतुतील आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनासाठी उत्साह दिसुन येत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा पर्यटनास बहर येणार आहे.
आगामी काळात महामंडळाकडुन देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत पर्यटक निवासाच्या बुकिंगच्या अधिक माहीतीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेब साईटवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.