“एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल

मुंबई, २ सप्टेंबर २०२३: जालन्यात अंरतवाली येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात बोलण्यास वेळ आहे. पण, एकाही मंत्र्याला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. दोन फुल एक हाफमधील एकही नेता गेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

“मी जालन्याला जाणार आहे. शुक्रवारी जालन्यात शासकीय अत्याचार झाला. याचा फक्त निषेध करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवरती ताशेरे मारले आहेत. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर ‘एक फुल, दोन हाफ’ आहेत. राज्यात आंदोलन सुरू असून, माता-भगिनी उपोषणाला बसले आहेत, मात्र कोणाकडेही वेळ नाही. ‘इंडिया’ची पत्रकार परिषद सुरू असताना एका ‘उप’ने पत्रकार परिषद घेतली,” असं अप्रत्यक्षपणे टीकास्र उद्धव ठाकेंनी फडणवीसांवर केलं आहे.

“तुम्हाला ‘इंडिया’च्या विरोधात बोलायला वेळ आहे. मात्र, एकाही मंत्र्यांला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. ‘एक फुल दोन हाफ’मधला एकही गेला नाही. आता चौकशीचा फार्स आवळला जाणार. आम्ही काहीच केलं नाही, सखोल चौकशी करणार. प्रत्येक मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्यात काय चालू आहे, याची कल्पना दिली जाते. एक फुल दोन हापला हे आंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का? बारसूला मारहाण झाली, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. आता जालन्यात लाठीहल्ला झाला आहे. पण, अजूनही चौकशा सुरू आहेत. करोना काळत पोलिसांनी जिवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवला. ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात? सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस होऊ शकतो? कोणतरी याच्या पाठीमागे आदेश देणार आहे,” अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.

“सरकार आपल्या दारी थापा मारते लय भारी. तो कार्यक्रम त्यांना तिकडे घ्यायचा आहे. आता घेऊ शकतील का माहिती नाही. ७०-७५ वर्षाच्या वृद्धेलाही घरात घुसून मारहाण करण्यात आली. आम्ही सखोल चौकशी करू, दोषींना सोडणार नाही. पहिले तुमच्यावर दोषारोप झाले, म्हणून सत्तेवर जाऊन बसलात. तुम्ही कोण चौकशी करणारे?” अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.