महायुती सरकारमध्ये आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा – वडेट्टिवार यांच्या नंतर रोहित पवार यांची टीका

मुंबई, १३ जानेवारी २०२४: राज्य सरकार शासकीय रुग्णवाहिकेद्वारे पैसे कमावण्याचा उद्योग करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, रुग्णवाहिकांसाठी चार हजार कोटींची निविदा काढणं अपेक्षित होतं. परंतु, राज्य सरकारने ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी तब्बल आठ हजार कोटींची निविदा काढली आहे. याद्वारे मंत्र्यांचा, त्यांच्या नातेवाईकांचा आणि जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे लोक सरकारी तिजोरी लुटायला निघाले आहेत.

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, राज्याच्या आरोग्य विभागात अनेक मोठे घोटाळे चालू आहेत. एका कंपनीला चार वर्षांसाठी ६०० कोटी रुपयांचं कंत्राट देण्याची आवश्यकता होती. परंतु, राज्य सरकारने ते कंत्राट फुगवून दोन ते तीन हजार कोटींचं कंत्राट दिलं आहे. यासाठी आरोग्य विभागाने वित्त विभागाशी साधी चर्चादेखील केली नाही. तर जिथे ६० कोटींचा खर्च अपेक्षित होता, तिथेच तब्बल ६०० कोटींचं कंत्राट देऊन अफाट खर्च केला जाणार होता. वित्त विभागाच्या परवानगीशिवाय यासाठीची कंत्राटं काढण्यात आलं होतं. परंतु, शिवसेनेच्या ठाकरे गाटातील खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते कंत्राट रद्द करण्यात आलं. म्हणजेच राज्य सरकारमधील काही लोक याद्वारे मोठा घोटाळा करणार होते. परंतु, विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना हा घोटाळा करता आला नाही.

आमदार रोहित पवार म्हणाले, आजच्या घडीला आपल्याकडे खोकल्यावरील औषध उपलब्ध नाही. कारण ती कंपनी आरोग्यमंत्र्यांना पैस देत नसावी, म्हणून त्यांना औषध विकण्याची परवानगी दिली नसावी. असे अनेक घोटाळे राज्यात चालू आहेत. सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. जे कंत्राट राज्य सरकारने नागपूर अधिवेशनात रद्द केलं, ज्यामध्ये ६० कोटींऐवजी ६०० कोटींचा खर्च केला जाणार होता, त्याबाबतची माहिती सरकारने दिलेली नाही. ते कंत्राट कोणाचं होतं, कोणाला दिलं, का दिलं? या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. अर्थमंत्री अजित पवारांची या घोटाळ्यांना परवानगी होती का याची शहानिशा व्हायला हवी. तुम्ही व्यक्तीगत लाभांसाठी निविदा काढता, परंतु, त्यातला घोटाळा विरोधकांनी बाहेर काढल्यावर रद्द करताय. हे प्रकार थांबायला हवेत.

रुग्णवाहिका खरेदीचा घोटाळा, औषध खरेदीचा घोटाळा, आरोग्य विभागातील भरतीचा घोटाळा असे अनेक घोटाळे राज्याच्या आरोग्य विभागात चालू आहेत. अजित पवारांना या घोटाळ्यांची माहिती होती का? त्यांना हे कसं काय पटलं? त्यांची याला परवानगी होती का? असे प्रश्नदेखील रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले.