हसन मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी
पुणे, ११ जानेवारी २०२३ : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केलं आहे.
“माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले
पुढे बोलताना, “दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन”, असेही ते म्हणाले.