फडणवीसांकडे अजित पवारांचा फोन नंबर नाही का – जयंत पाटील यांचा फडणवीसांना खोचक टोला

नागपूर, ८ डिसेंबर २०२३: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले. यानंतर विरोधकांची टीकेची धार कमी होईल असे वाटत होते. मात्र त्यांच्याकडून अजूनही भाजपला घेरण्याचे काम होतच आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ‘देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिले, त्यांच्याकडे अजित पवारांचा फोन नंबर नव्हता का ? असा त्यांच्या खास शैलीत खोचक टोला लगावला.

फडणवीसांचं पत्र म्हणजे बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. उपमु्ख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन नंबर आहे असं दिसत नाही. असे प्रश्न फोनवर सांगायला हवेत. त्यासाठ पत्र लिहिणं हे आश्चर्यच म्हणावं लागेल. माझ्या मते जी माहिती फोनवर अजित पवारांना देता आली असती त्यासाठी मात्र सोशल मीडियावर पत्र पोस्ट करायला प्राधान्य दिलं.
हे पत्र म्हणजे एका उपमुख्यमंत्र्याकडून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला माहिती देण्यासाठी आहे की आपली बाजू स्वच्छ करण्यासाठी आम्ही त्यातले नाहीत हे सांगण्यासाठी आहे हा अभ्यासाचा विषय आहे. यात भाजपाची अडचण झाल्याचं दिसतंय. टायमिंग साधण्याचा विषय तर फार लांब आहे. त्यामुळे आपली बाजू स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, या पत्रावरून राजकारणात गदारोळ उठला असून अजित पवार गटाचे नेतेही भाजपवर टीका करू लागले आहेत. यामुळे वाद आणखी वाढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वादाचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पडणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल. परंतु, राज्यातील जनता आणि विरोधकांचा मूड पाहता भाजपाने तत्परता दाखवत पत्र लिहिण्याची खेळी केली. त्यामुळे विरोधकांनी मिळालेली आयती संधी काढून घेण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करण्याची संधी विरोधकांना मिळणार नाही.

फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र

नवाब मलिक यांनी आज विधानसभा परिसरात येऊन कामकाजात सहभाग घेतला. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा अधिकार आहे. त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व किंवा पूर्वग्रह नाही, मात्र त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले आहेत ते पाहता त्यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं पत्र फडणवीसांनी पवारांना लिहिलं.