शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य
जत, 6 नोव्हेंबर २०२४ : शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यभरात जोरदार सभांचा धडाका सुरु आहे. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या जतमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भाषण करीत वादग्रस्त वक्तव्य केलंय.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, आपण शेतकरी आहोत. आपल्या घरात गाय असते तसं राज्याची तिजोरी ही गाय असते. गायीला चार थान आहेत. त्यातील अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे जनतेला आणि साडेतीन थानातंल दोन थानाचं दूध आपणच हाणायचं, असं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलं पण फडणवीस म्हणाले, चारही थानं वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरालाचं देणार. त्यानंतर शरद पवार यांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. आता माझ्या चिल्यापिल्यांचं काय होईल, असं पवारांना वाटलं. पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी बॅंका, कारखाने, सुतगिरण्या हाणल्या एढं हाणलं तरीही तुम्हाला महाराष्ट्र बदलायचायं, शरद पवार तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असा थेट सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केलायं.
संपूर्ण राज्याचं लक्ष जत विधानसभा निवडणुकीकडे लागलंय. बहुजन समाजाचा ढाण्याच वाघ जतमध्ये उभा राहिलायं. काहींना तर गोपीचंद पडळकर जेवताना वाटीतल्या भाजीतही दिसायला लागलायं. काही लोकं आता बोलतात की हे बाहेरुन आलंय पण हे बाहेरुन कुठून पाकिस्तानातून आलंय का? तुमच्या सोनियाकाकू कुठून आल्या आहेत हे विचारा त्या इटलीवरुन आल्या तरीही तुम्ही त्यांना लोटांगण घालतायं, हा तर आमच्या मातीतला बहुजन नेता आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केलीयं.