कोणाला कोणते पत्र द्यावे कळते का? अजित पवारांनी टिंगरेंना झापले
पुणे, २९ मे २०२४ ः ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे यांची अधिक्षकपदी नियुक्ती व्हावी यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिल्यावरून ते चांगलेच अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही डोक्याचा ताप वाढला आहे. कोणते पत्र कुठे द्यावे कळते का? कोणाची शिफारस करावी हे कळते का ? असा जाब विचारत पवार यांनी टिंगरे यांना खडसावल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील कार अपघाताचं प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे सुद्धा अडचणीत आले आहेत. त्यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून डॉ. अजय तावरे यांची शिफारस केली होती. त्यानंतर डॉ. तावरे यांची ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महायुती सरकारमधील अजित पवार चांगलीच कोंडी झाली आहे.
गुन्हे शाखेने अटक केलेल्या डॉ. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यानंतरच अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या शिफारसीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
आमदार सुनील टिंगरे यांच्या या शिफारस पत्रावर विनंतीप्रमाणे अतिरिक्त कारभार त्यांना देण्यात यावा. नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकर्ष पूर्ण करत नाही, असा शेरा तत्कालीन वै हसन मुश्रीफ यांनी या पत्रात दिला होता. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी 26 डिसेंबरला मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते तर २९ डिसेंबरला वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी शेरा दिला होता.
तावरे यांच्या अटकेनंतर याचा संबंध थेट अजित पवार आणि टिंगरे यांच्याशी जोडला गेला. अपघात झाला तेव्हा आमदार टिंगरे हे पोलिस ठाण्यात होते, त्यांनी अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत होता. त्यानंतर याच प्रकरणात तावरे यांना अल्पवीयन मुलेच रक्त नमूने बदलून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले. त्यातही टिंगरे यंनी तावरे यांना अधिक्षक करावे यासाठी पत्र दिल्याचे समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. त्यंच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. स्वतः अजित पवारही नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना चांगलेच खडसावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.