मनीषा कायंदे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी
मुंबई, १८ जून २०२३ : शिवसेनेतील ठाकरे गटातील उपनेते शिशिर शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मुंबईत सुरू झालेली आहे. याची दखल घेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने मनीषा कायंदे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केल्याने आता कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मांडल्याचे जात आहे. तर शिवसेनेतर्फे मनीषा कायंदे या फिरता चषक असल्याची टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेतील बंडखोरीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. तरीही शिवसेनेतील ( ठाकरे गट ) गळती थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आता आमदार मनिषा कायंदे ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची माहिती आहे. आज ( १८ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश करण्याची शक्यता आहे.
१९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी वरळीत आज ठाकरे गटाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराकडे मनिषा कायंदे फिरकल्याच नाहीत. तसेच, त्यांचा फोनही नॉटरिचेबल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही मनिषा कायंदे यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही.
मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे नुकसान होऊ शकते.
कायंदे हे शिंदे गटात जाणार जवळपास निश्चित झालेले असल्याने शिवसेना पक्षाकडून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नसली तरी पहिली कारवाई म्हणून त्यांना प्रवक्ते पदावरून हाकलून देण्यात आलेले आहे. त्याबाबतचे परिपत्रक आज सायंकाळी ठाकरे गटातर्फे करण्यात आले.
ठाकरे गटातील एक आमदार बाहेर पडणार असल्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “कचरा इकडे तिकडे उडत असतो. तो कचरा हवेचा झोका बदलल्यानंतर आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करा.”
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मनीषा कायंदे या फिरता चषक आहेत त्यापूर्वी भाजपमध्ये होत्या. त्यांनी पुन्हा एकदा पक्ष सोडलेला आहे. त्यामुळे कायंदे शिवसेनेतून गेला तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही.”