Pune: PM Modi's Accusations of Rs 70,000 Crore Corruption by NCP Met with Sharp Response from Sharad Pawar

आम्ही संताजी धनाजी असे म्हणत शरद पवारांकडून मोदींची थेट औरंगजेबाशी तुलना

मुंबई, १९ जानेवारी २०२४: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डीतल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यावरच टीका करतील हे मला ठाऊक आहे.. त्याचप्रमाणे इतिहासात काहीजण जसे संताजी धनाजींना घाबरायचे तसे आत्ताचे राज्यकर्ते आम्हाला घाबरत आहेत असाही टोला आपल्या भाषणात लगावला.

आज महाराष्ट्र साखर देशातला उसाची निर्मिती करणारा साखर निर्मिती करणारं क्रमांक दोनचं राज्य आहे. साखर निर्यात करुन दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत होते मात्र त्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांविषयीची आस्था नाही. मी जेव्हा सरकारशी चर्चा करायला जातो तर मला सांगितलं जातं तुम्ही जो पिकवतो त्याचा विचार करता आम्ही खाणाऱ्याचाही विचार करतो. मी म्हटलं खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे पण पिकवणाऱ्याचा विचार केला नाही त्याला जर उपाशी मारलं तर तो काय पिकवणार? त्यामुळे मी त्यांना सांगतो पिकवणाऱ्याचा विचार आधी केला पाहिजे. तुम्ही तो विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या धोरणाला आम्ही पाठिंबा देणार नाही असं मी सरकारला सांगितलं आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी एक पुस्तक वाचत होतो. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांनी लिहिलं आहे मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या १०० साखर कारखान्यांवर एक्साईज ड्युटी होती ती माफ केली. शरद पवारांना हा निकाल देता आला नाही. बरोबर आहे, कारण माझ्यापुढे प्रश्न होता की लहान शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करायचं की या कारखान्यांवरची एक्साईज ड्युटी. साखर कारखानदारी महत्त्वाची आहे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. पण १०० कारखान्यांची ड्युटी माफ करणं महत्त्वाचं आहे की देशातला थकबाकीदार असलेला शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. आम्ही देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं. बळीराजा जगला पाहिजे. त्याला कर्जमुक्त केलं पाहिजे हेच आम्हाला महत्त्वाचं वाटलं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींचं कर्ज आमच्या काळात माफ केलं.

आज शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. आम्ही ज्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या त्या हे सरकार मुळीच करत नाही म्हणून हे सगळं झालं आहे. आज मोदी सोलापुरात आहेत. तुम्ही त्यांचं भाषण ऐका. १०० टक्के मी सांगतो की ते माझ्यावर टीका करणार. परवा शिर्डीला गेले तेव्हा मंदिरात दर्शन घेतलं आणि भाषणात म्हणाले शरद पवारांनी देशासाठी काय केलं? तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्यायला आला आहात तर त्या घ्या उगाच चुकीच्या गोष्टी कशाला बोलता असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. इतकंच नाही तर इतिहासात आपण वाचलं आहे की काही लोकांना छत्रपती शिवरायांच्यानंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत. आज तशाच प्रकारची चिंता आमच्याबद्दल वाटते त्यामुळेच अशी विधानं आमच्याबद्दल ते करतात. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

मोदींनी बोलत रहावं, काही हरकत नाही. आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी जो आदर्श ठेवला आहे त्या आदर्शावर आम्ही चालणार. सांगोला हा राजकीयदृष्ट्या जागरुक तालुका आहे. मुंबईच्या डॉकमध्ये सांगोल्यातले लोक बरेच होते. मी एकदा केरळला गेलो होतो, तामिळनाडूतही गेलो तिथे मराठी माणसं भेटायची. मद्रास किंवा कोचिनमध्ये मी विमानातून उतरलो की भेटणारे लोक राम राम साहेब म्हणायचे ते सांगायचे आम्ही सांगोल्याचे आहोत. सोनं गाळण्यासाठी या दुष्काळी पट्ट्यातले लोक देशात अनेक ठिकाणी जात असतात. असाही उल्लेख शरद पवारांनी केला.