धैर्यशील माने यांचे आदित्य ठाकरे यांना उत्तर
कोल्हापूर, १६ आॅगस्ट २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात येताच रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर लगेचच लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले. त्यामुळे खासदार माने मतदारसंघात आले नव्हते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघातून रॅली काढत पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघात काढलेल्या संवाद यात्रेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे.
दुचाकी रॅली काढून खासदार माने यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे. किणी टोलनाक्यायर खासदार माने यांचे आगमन होताच जय भवानी ! जय शिवाजी !’एकच वादा धैर्यशील दादा’. …वंदे मातरम चा जयघोष करीत हजारोंच्या संख्येतील तरुणानाईने प्रचंड जल्लोष करीत अभूतपूर्व उत्साहात खासदार माने यांचे स्वागत केले. आपल्या नेत्याने घेतलेला निर्णय बरोबर असून आम्ही तुमच्या सोबत असल्याचा पाठिंबाच कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावीत दर्शविला.
राज्यात घडलेल्या राजकीय बदलाच्या घडामोडीत खासदार माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करीत सोबत राहण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले. त्यामुळे या साऱ्या घडामोडीनंतर खासदार माने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात आले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते तिरंगा झेंड्यासह टोल नाक्यावर जमू लागले होते, ढोल ताशे, फटाक्यांची अतिषबाजी व तिरंगा घेतलेले कार्यकर्ते यामुळे संपूर्ण टोल नाका परिसर तिरंगामय झाला होता. टोलनाक्यावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत करून समर्थनाचे पाठबळ दिले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आमदार अदित्य ठाकरे यांनी राज्यभर संवाद यात्रा काढत शिवसैनिकांशी संपर्क साधला. दोन ऑगस्टला ठाकरे कोल्हापूरसह हातकणंगले मतदारसंघात आले होते. त्यांच्या यात्रेला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावेळी ठाकरे यांनी खासदार माने यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मतदासंघात आल्यानंतर खासदार माने यांनी तिरंगा रॅलीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करीत एकप्रकारे ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे.