देवेंद्रजींना अपमान सहन होत नाही आणि सांगता येत नाही – उद्धव ठाकरे यांनी लगाव लाटोला

मुंबई, १८ जून २०२३ : देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे.” अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

आज वरळी येथे ठाकरे गटाचं शिबीर आयोजित केलं आहे. या शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल तर देशाला आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर हे करून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

खरं तर, काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला. या विधानावरून उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे.”
“कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच. सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी कष्ट करून, मरण यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे, यावर तुमचं मत काय? सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.