अजित पवार यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
मुंबई, २७ जुलै २०२२: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. विकास कामांना स्थागिती देण्यावरून अजित पवार यांनी राज्य
सरकारला लक्ष्य केले होते. यामध्ये वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या कामाला स्थगिती
दिल्याचा गंभीर आरोपही केला होता. यावरून मोठी खळबळ उडाली असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी स्वत: यावर खुलासा केला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत सुटलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी
महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाच्या कामालाही स्थगिती दिल्याचा अजित पवार यांचा आरोप
फेटाळताना फडणवीस यांनी
म्हटले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वढू येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातील कामांना आमच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. दादांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिले हे पाहिले पाहिजे होते.
खुलासा करताना फडणवीस यांनी पुढे म्हटले की, मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिले आहे की, या
कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामे घेतली आहेत. त्यासंदर्भातील
सादरीकरण मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांसमोर करावे. त्यात काही कामे राहिली असतील तर त्याचाही
समावेश करण्यात येईल.
काय म्हणाले होते अजित पवार…
अजित पवार यांनी काल पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना म्हटले होते की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत काम केले आहे, त्यांनीच मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे.
असे करण्याचे काहीच कारण नव्हते. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकारे येत असतात जात असतात.
आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय ? हेही कधीतरी जाणारच आहेत. त्याचा विचार करायचा की
नाही. शिंदे आणि फडणवीस यांना इशारा देताना पवार यांनी
म्हटले होते की, 2021 पर्यंतची कामे बंद करणे योग्य नाही.विकासाची कामे होती. महाराष्ट्रातील कामे होती,
कुणाच्या घरादारातील कामे नव्हती.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा निधीही अडकला आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असे
खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्रात झाले नव्हते. हे तातडीने थांबवा.