ललित पाटील प्रकरणात बडबड करणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांचा फास आवळणार – देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

पुणे, १८ ऑक्टोबर २०२३: ड्रग्ज रॅकेट चालवणारा फरार आरोपी ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित पळून गेल्यानंतर त्याला आज अटक करण्यात आली. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत या प्रकरणात जे आरोप करत आहेत, त्यांचाच फास आवळणाऱ्यांचा इशारा दिला आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झडत होत्या. सरकारमधील काही मंत्र्यांची नावे या प्रकणात समोर आली होती. दरम्यान, ललित पाटीलला अटक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले ड्रग्ज फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आता ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, मला काही गोष्टी कळल्या आहेत, पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्यवेळी मी बोलेन. पण, एवढंच सांगतो की, एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असं फडणवीस म्हणाले.

मी पळालो नाही तर मला पळवण्यात आले, असं ललित पाटील यांने सांगितले. या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावं समोर आली होती. याविषयी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, ललित पाटील काय बोलतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा आता पोलिस तपासातून जे नेक्सस बाहेर येईल, त्यावर लक्ष द्यायला हवं. पोलीस तपासात नेक्सस बाहेर आलं की, सगळ्यांची तोंड गप्प होतील. पोलीस सर्व तपास करत आहेत. दोषींना अजिबात सोडणार नाही. सगळ्यंवर कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.