देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांना उद्योग राहिला नाही

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२: मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजी असल्याच्या वारंवार चर्चा होत आहेत.

सुरुवातील उपमुख्यमंत्रिपदावरून, नंतर मंत्रीमंडळ विस्तारावरून, नंतर खातेवाटपावरून आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीवरून हे तर्कवितर्क लावले गेले. यावर पत्रकारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी पत्रकारांनाच खोचक टोला लगावला. ते मंगळवारी (१८ ऑक्टोबर) दिल्लीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत काही पत्रकारांना उद्योगच उरले नाहीत. त्यांना विपरीत बातम्या मिळत नाहीत. त्यामुळे ते अशा मजेदार बातम्या तयार करत आहेत. मी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी या बातमीचा खूप आनंद घेतला आहे. आम्ही मनापासून यावर हसलो आहे. असल्या फॅक्टरीतून तयार झालेल्या बातम्यांवर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची.”

आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. या ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’मुळे आशियातील सर्वांत मोठ्या अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावरही यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. ती मागणीही मांडण्यात आली.”

“याबाबत सकारात्मक विचार करण्याचे अभिवचन रेल्वेमंत्र्यांनी दिले. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८७ कोटी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा ४८७ कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. या कार्यादेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी आज दिली. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेक चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यात प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळणार आहेत. याभागातील सामाजिक-आर्थिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. हा कार्यादेश जारी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मी नितांत आभारी आहे. प्रत्येक नागपूरकराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.”

एअर इंडियाची इमारत महाराष्ट्राला
देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली आणि मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली. फडणवीस म्हणाले, “सध्या मंत्रालय आणि अ‍ॅनेक्स इमारत मिळूनही शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला.”

“सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.