“ठाकरेंनी मुंबई महापालिकेत केला साडे बारा हजार कोटीचा घोटाळा” – देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
कल्याण, १९ जून २०२३: भाजप आणि ठाकरे गटातील नेते एकमेमकांवर रोज आरोप प्रत्यारोप करत असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालात मुंबई महापालिकेत साडे बारा हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यांच्या तिजोरीत गेलेला प्रत्येक पैसे आमचं सरकार परत आणेल, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलं.
आज (सोमवार, १९ जून) कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. देवेद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंचा पर्दाफाश करायचं ठरवलं आहे. आजच मुंबई महानगरपालिकेबाबतचा कॅगच्या अहवाल समोर आलाय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे आजच एकनाथ शिंदेंनी यावर ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. या ‘एसआयटी’च्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही (उद्धव ठाकरे) तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातील प्रत्येक पैसा परत आणण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल.”
“महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षात राज्यात परिवर्तन घडवण्याचं काम आमच्या सरकारने केलं. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या काळात एमएमआरडीच्या क्षेत्रात एकही काम केलं नाही. येथील सगळ्या योजना आम्ही केल्या. महाविकास आघाडी एक पैशाचीही योजना आणू शकली नाही” अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
फडणवीस यांच्या या आरोपनंतर फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंभोज यांनी पुढील ४५ दिवसात मुंबई महापालिकेत आग तर लागणार नाही ना असे सूचक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत महापालिका निवडणूक जवळ येत असताना भाजपकडून ठाकरे परिवाराला टार्गेट करण्यासाठी नवीन घोटाळा बाहेर काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.